पुलगाव येथील वर्धा नदीवरील नादुरुस्त पूलाची दुरुस्ती करून जीवघेणा प्रवास सुखकर करण्याची काँग्रेस महासचिव अश्विन शहा यांची मागणी
देवळी:
पुलगाव येथील वर्धा नदीवर असलेला लहान पूल हा अतिशय क्षतिग्रस्त झाल्यामुळे प्रशासनाने या पुलावरून वाहतूक बंद केली आहे. परंतु वाहन चालक आपले वाहन त्याच पुलावरून चालवून जीवघेणा प्रवास करीत आहे. येथे मोठ्या अपघात होण्याची दाट शक्यता आहे. पूल अतिशय क्षतीग्रस्त झाल्यामुळे केव्हाही अपघात होऊ शकतो. या पुलाच्या दुरुस्तीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन नागरिकांचा सुखाकर प्रवास होण्यासाठी या पुलाच्या दुरुस्तीची मागणी पुलगाव येथील काँग्रेसचे महासचिव अश्विन शहा यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी केली आहे.
प्रशासनाचे या पुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत अश्विन शहा यांनी बोलून दाखवली. त्याचबरोबर हा पूल दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून हा पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने नागरिकांना तीन किलोमीटरचा लंबा टप्पा घाटून वर्धा नदीवरील मोठ्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे.
प्रशासनाने पूल वाहतुकीसाठी बंद आहे असा फलक तर लावला परंतु अजूनही नागरिक या पुलावरून जीवघेणा प्रवास करीत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. लवकरात लवकर या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा मानस असल्याचे काँग्रेस महासचिव अश्विन शहा यांनी बोलून दाखविले.