संजय गांधी निराधार समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाला स्थान नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
वर्धा जिल्ह्यामध्ये नुकत्याच संजय गांधी निराधार समितीच्या समित्या घोषित झाल्या. संजय गांधी निराधार समित्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कुठल्याही कार्यकर्त्याची वर्णी लागली नसल्यामुळे शिंदे गटातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा आहे. वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातील कमिट्यांमध्ये फक्त भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे. सरकार तर शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्रीही शिवसेनेचा परंतु मुख्यमंत्र्याच्याच कार्यकर्त्यांना डावल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
कमिट्या घोषित झाल्यानंतर अभिनंदनचे जे मोठ मोठे बॅनर लावले त्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोच नसल्यामुळे जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा रंगत आहे.
पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार संजय गांधी निराधार समितीची कार्यकारणी घोषित केली गेली, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना कमिटी मध्ये उपमुख्यमंत्र्यांनीच घेतले नाही अशी चर्चा वर्धा जिल्ह्यामध्ये रंगत आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर मोठ्या आशेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसैनिकांचा मोठा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या संजय गांधी निराधार समित्या गठित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षाला त्यामध्ये स्थान देण्यात आले होते.
परंतु आता तर मुख्यमंत्र्यांचा फोटो सुद्धा बॅनर वर झळकत नसल्यामुळे व संजय गांधी निराधार समित्यांमध्ये कुठेही शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना स्थान न देण्यात आल्यामुळे वर्धा जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.