काजळसरा येथे ट्रांसफार्मर बसवण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढून शेतकऱ्यांची विरूगिरी. आंदोलनाच्या अवघ्या दोन तासातच ट्रान्सफॉर्मर दाखल.

काजळसरा येथे ट्रांसफार्मर बसवण्याच्या मागणीसाठी टॉवरवर चढून शेतकऱ्यांची विरूगिरी.
 आंदोलनाच्या अवघ्या दोन तासातच ट्रान्सफॉर्मर दाखल.
  वर्धा:
    देवळी तालुक्यातील काजळसरा शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात गेल्या तीन महिन्यापासून रोहित्राच्या बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने रब्बी हंगामात काजळसरा शिवारातील चारशे एकर जमीन पडीत पडण्याच्या मार्गावर होती. या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त होते. अनेकदा महावितरण कार्यालयाचे उंबरडे झिजवून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटला आणि शेतकऱ्यांनी आज 16 नोव्हेंबर रोजी चक्क टॉवरवर चढून विरुगिरी करत आंदोलन केले.
    जवळपास दहा ते बारा शेतकरी विद्युत टॉवर चढल्याने परिसरात खळबळ उडाली. शेतकऱ्यांच्या या कृतीला समर्थन करणाऱ्या अनेक पिढीत शेतकऱ्यांनी टावर खाली शेतात गर्दी केली. थोड्या वेळातच महावितरणचे अधिकारी पोलीस कर्मचारी आंदोलन स्थळी दाखल झाले. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी आज ट्रांसफार्मर लावल्या शिवाय टॉवर वरून उतरणार नाही अशा आपल्या मागणीवर ठाम राहिले. 
    तहसीलदार तसेच महावितरणच्या अभियंत्यांनी सुद्धा आठ दिवसात ट्रान्सफॉर्मर बसेल शेतकऱ्यांनी संयम बाळगावा असे आवाहन केले. परंतु शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली. आजच ट्रान्सफॉर्मर लावा तेव्हाच आम्ही खाली उतरू असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
      युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे व पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले त्यांनी शेतकरी व महावितरणच्या अधिकाऱ्याची मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आजच दोन ट्रांसफार्म लावून देतो असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले ट्रान्सफॉर्मर लावण्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 
    शेतकऱ्यांनी मागण्या मान्य केल्या बाबत विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्याचे आभार मानले. यावेळेस आंदोलनकर्ते शेतकरी दिलीप बिजवार, अशोक राऊत, विजय शेंडे,रामचंद्र जाधव, नामदेव सोनवणे, शुभम वासनिक, यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
public voice news
public voice news