जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रदर्शनाला भेट देवून नवीन कायदे विषयक माहिती नागरिकांनी जाणून घ्यावी -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
वर्धा प्रतिनिधी - 1 जुलै 2024 पासून देशात लागू झालेल्या नवीन कायद्याची माहिती असलेले प्रदर्शन केंद्रीय संचार ब्युरो वर्धा यांच्यामार्फत लावण्यात आले असून सदर प्रदर्शनात नवीन कायद्याची संपूर्ण माहितीची मांडणी छायाचित्राच्या स्वरूपात तसेच डिजीटल स्वरुपात व्हिडीओच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली असून नागरिकांनी सदर प्रदर्शनाल भेट देवून कायदेविषयक माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.
माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वर्धा, जिल्हा प्रशासन, वर्धा, जिल्हा परिषद, वर्धा, जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय, वर्धा, जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या ‘‘नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता 2023’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शनाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भेट देऊन पाहणी केली.
याप्रसंगी भारतीय प्रशासकीय सेवेचे परिविक्षाधीन अधिकारी श्री. डोंगरे, केंद्रीय संचार ब्युरो वर्धाचे क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश विवेक देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा स्मृती चिन्ह व रोपटे देवून क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी सत्कार केला. सदर प्रदर्शन 1 ऑगस्ट 2024 पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे.