नव्या पिढीच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आपल्या सर्वांची जबाबदारी -पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
आष्टी येथे शहीद स्मृती दिन कार्यक्रम
पालकमंत्र्यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली
वर्धा : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेकडो लोकांनी जीवाचे बलिदान दिले. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात देशप्रेमासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आष्टी येथील सहा देशभक्त शहीद झाले. त्यांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीपर्यत पोहचली पाहिजे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नव्या पिढीला माहिती झाला पाहिजे. नव्या पिढीच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आष्टी येथे शहीद दिनानिमित्त हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलीस अधीक्षक अनुराग जैन, नगरपंचायतचे नगराध्यक्ष अनिल धोत्रे, डॉ.अरविंद मालपे, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष भरत वंजारा, श्रीधर ठाकरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर पुढे म्हणाले, आष्टी गावाला देशभक्तीचा वारसा लाभलेला आहे. शहिदांमुळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. आष्टी नावाची गावे देशभरात अनेक आहेत, मात्र आपले आष्टी शहीद नावाने संपूर्ण देशभर ओळखले जाते. भारत छोडो आंदोलनाला गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. देशाला 1947 ला स्वातंत्र्य मिळाले मात्र स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात 1942 पासून आष्टी गावात झाली, असे ते म्हणाले.
आमदार सुमित वानखेडे म्हणाले की, शहीदांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. शहीद जिवापेक्षा देशाला अधिक महत्त्व देऊन अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभे राहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले ते टिकवणे महत्त्वाचे आहे. देशाच्या संस्कृतीची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. सर्व समाजासाठी एकत्र येऊन काम करण्याची शपथ हुतात्मा भूमीतून करूया, असे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या, तंत्रज्ञानाचे युग आता आहे, मात्र 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन सुरू होऊन केवळ आठ दिवसात दूर वसलेल्या छोट्याशा गावात एवढी मोठी क्रांती झाली यावरून प्रखर देशभक्तीची भावना दिसून येते, असे त्या म्हणाल्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत वंजारा यांनी प्रास्ताविकात आष्टी येथील स्वातंत्र्य लढ्याची माहिती दिली. डॉ. अरविंद मालपे, नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीस पालकमंत्री डॉ. पंकज भोयर व आ.सुमित वानखेडे यांनी आष्टी येथील हुतात्मा स्मारक येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यास देखील त्यांनी पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास नागरिक, विद्यार्थी, शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.