देवळी येथे सीसीटीव्ही सरव्हेलन्स सिस्टीम, फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण

पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण वाढले, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

 देवळी येथे सीसीटीव्ही सरव्हेलन्स सिस्टीम, फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण

वर्धा येथे होणार फॉरेन्सिक प्रयोगशाळा

 फिर्यादीस मुद्देमालाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप

वर्धा : देशासह, राज्यात शांतता ठेवण्याचे काम पोलिस करित आहे. पोलिसांचे काम बघून जहाल नक्षलवादीसुध्दा आत्मसमर्पण करित आहे. पोलिस यंत्रणा अधिक बळकट व सुदृढ करण्याचे काम सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मोबाईल फॉरेन्सिक लॅब, वाहने, बसेस, सीसीटीव्ही आदी अत्याधुनिक उपकरणे देऊन पोलिस विभागाचे बळकटीकरण करण्यात येत असून पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.


देवळी येथे सीसीटीव्ही सरव्हेलन्स सिस्टीम, फॉरेन्सिक व्हॅनचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते लोकार्पण झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार राजेश बकाने, आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूरचे उपसंचालक अश्विन गेडाम, देवळीचे पोलिस निरीक्षक अमोल मंडाळकर यांच्यासह पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ.भोयर पुढे म्हणाले, सीसीटीव्ही पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करतो. सीसीटीव्ही लावण्यात आले तेव्हापासून पोलीस दलाला गुन्ह्यांची उकल करण्यास मदत झाली. गुन्हेगारांच्या मनामध्ये धास्ती निर्माण झाली असून गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत आहे. देवळीसारख्या छोट्या शहर व परिसरात 22 ठिकाणी 88 सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

चोरी, दरोडा यासारख्या गुन्ह्यांमध्ये जप्त झालेला मुद्देमाल परत मिळावा म्हणून नागरिकांना चकरा माराव्या लागत होत्या. परंतू आता जिल्हा पोलिस दलाने उत्कृष्ट कामगिरी करुन जप्त केलेला 41 लक्ष रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात येत आहे, यासाठी वर्धा पोलिस दलाचे पालकमंत्री डॉ. भोयर यांनी अभिनंदन केले.

वर्धा येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विविध गुन्हांची उकल लवकर करण्यास मदत होईल. देवळी शहरातील गरजू लाभार्थ्यांना पट्टे वाटपासंदर्भात लवकरच बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल. पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी यांच्या पाल्यांना कौशल्य विभागाच्या माध्यमातून राज्यभरात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

आमदार बकाणे म्हणाले, नागरिक आतुरतेने सीसीटीव्ही लागण्याची वाट पाहत होते. अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत देवळी शहर व परिसरातील सीसीटीव्ही कार्यरत झाले, त्यासाठी त्यांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांचे आभार मानले. देवळी व पुलगाव येथे नवीन पोलिस स्टेशन इमारत व वसाहतीची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार कुणावार म्हणाले, अनेक वर्षांपासून मुद्देमाल परत मिळण्यासाठी फार कालावधी लागायचा. आशा सोडलेल्या लोकांना चांगल्या पोलिसींगव्दारे जप्त केलेला मुद्देमाल लवकर मिळत आहे. पोलिस दलाचे आधुनिकीकरण झाल्यामुळे दिवसेंदिवस गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना चांगली सेवा देता यावी म्हणून पोलिस भरती सुध्दा होणार असल्याचे ते म्हणाले.

माजी खासदार रामदास तडस म्हणाले, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे नागरिकांना होणारा त्रास सीसीटीव्हीच्या निगराणीमुळे कमी होणार आहे. आगामी पोलिस विभागाच्या क्रीडा स्पर्धा येथे घेण्यात याव्यात, असे म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्री डॉ.भोयर यांच्याहस्ते फॉरेन्सिक व्हॅन व बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील संघटनेच्यावतीने पालकमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले तर आभार निरिक्षक अमोल मंडाळकर यांनी मानले

public voice news