अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आले १४२ कोटी, निधी वितरणासाठी प्रशासनाची धावपळ
वर्धा :
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीचा तातडीने आढावा घेत राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून तब्बल १४२ कोटी ८ हजार रुपयांचा निधी वर्धा जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. या निधीच्या वितरणासाठी महसूल आणि कृषी विभागाकडून मोठी लगबग सुरू असून प्रशासनाने यासाठी धावपळ चालवली आहे.
सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसामुळे अनेक तालुक्यांतील पिकांचे नुकसान झाले. विशेषतः हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी आणि वर्धा तालुक्यांमध्ये सर्वाधिक हानी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ७७ हजार ३१६ शेतकऱ्यांचे ९६ हजार ६७८ हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. त्यासाठी शासनाने नुकसानभरपाई स्वरूपात निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
तालुकानिहाय पाहता, हिंगणघाट तालुक्यासाठी २६ कोटी ८७ लाख, समुद्रपूरसाठी २४ कोटी ६५ लाख, वर्ध्यासाठी २३ कोटी ५९ लाख, आर्वीसाठी १३ कोटी ३६ लाख, तर इतर तालुक्यांसाठी अनुक्रमे ७ ते १० कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
सध्या बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्याचे काम सुरू असून ७५ हजार ३२ शेतकऱ्यांची खाती आधीच अपलोड करण्यात आली आहेत. निधी लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सणांच्या सुट्ट्यांमुळे निधी वितरणाच्या कामात थोडा विलंब होत असला तरी जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशीही कार्यरत ठेवले आहे. महसूल आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय साधून ही प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या निधी वितरणामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.