पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली साटोडा व बोरगावच्या पीएचसी केंद्राच्या जागेची पाहणी

पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केली साटोडा व बोरगावच्या पीएचसी केंद्राच्या जागेची पाहणी

दोन्ही प्रा.आ.केंद्राचे होणार रविवारी भूमिपूजन

वर्धा : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष प्रयत्नामुळे वर्धा शहरालगत असलेल्या बोरगाव (मेघे), साटोडा, सालोड, पिपरी (मेघे), सिंदी मेघे या गावामध्ये पाच प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे. मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी बोरगाव मेघे व साटोडा, सालोड व सिंदी मेघे येथील प्रस्तावित जागेची आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पाहणी  केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अधियंता शुभम गुंडतवार, शाखा अभियंता नागेश शंभरकर,साटोडाचे सरपंच गौरव गावंडे, सालोडचे उप सरपंच आशिष कुचेवार, जयंत कावळे, सुधाकरराव साटोणे, विजय ताजणे, दिनेश वरटकर,पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते.

मंजूर करण्यात आलेल्या बोरगाव मेघे व साटोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीचे भूमी पूजन  दत्ता मेघे सभागृह सावंगी मेघे येथे २६ ऑक्टोंबर रोजी दुपारी 11.30 वाजता निरामय वर्धा अभियान सन्मान सोहळा प्रसंगी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या  अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ई भूमीपूजन संपन्न होणार आहे.



बोरगाव मेघे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 6 कोटी 10 लक्ष रुपये व साटोडा येथील 6 कोटी 9 लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी शहरी भागात जाण्याची आवश्यकता पडणार नसून यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या खर्चाची व वेळेची सुध्दा बचत होऊन चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ या प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांना मिळणार आहे. असे यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.पालकमंत्री डॉ. भोयर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम जागेची पाहणी करून संबंधित अधिका-यांना सूचना केल्या.

public voice news